परभणी -महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ५५ जणांना उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. ५ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. याप्रकरणी बोलताना अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'कोणाच्या चुका असतील तर त्या पुढे येतीलच आणि नसल्या तर तेही पुढे येईल, असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे परभणीत आगमन झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवारांसह इतर 55 राजकीय पुढाऱ्यांवर राज्य सहकारी बँकेच्या संबंधाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की कुणीतरी यासंदर्भात 'पीआयएल' दाखल केले आहे. त्यावरून उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे मला समजले आहे. परंतु, आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे 'जोपर्यंत निर्णयाची प्रत हातात येत नाही, तोपर्यंत याबाबत वक्तव्य करणे उचित नसल्याचे पवार म्हणाले.