परभणी -सातवा वेतन आयोग आणि आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विद्यापीठांचे अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील दीड हजार तर राज्यातील 4 विद्यापीठांचे सुमारे 7 हजार कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, 'अकृषिक विद्यापीठांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला; परंतु, शासन आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
कृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱयांचे लेखणीबंद आंदोलन परभणीप्रमाणे राज्यातील अन्य तिन्ही विद्यापीठात हे आंदोलन करण्यात येत आहे. परभणी विद्यापीठाच्या समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ.दिलीप मोरे, डॉ.गजेंद्र लोंढे, डॉ.सचिन मोरे, डॉ.राजेश कदम, डॉ महेश देशमुख, डॉ रणजित चव्हाण, राम खोबे, सुरेश हिवराळे, कृष्णा जावळे, विश्वाभर शिंदे, आत्मराम कुरवारे यांनी अन्य पदाधिकार्यांसह एकत्रित येत हे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवाअंतर्गत अश्वासित प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग ताततडीने लागू करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती डॉ.दिलीप मोरे यांनी दिली आहे.
'अत्यावश्यक सेवा वगळून आंदोलन'
यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थित राहत हजरी पत्रकावर स्वाक्षरी केली. मात्र, कुठल्याही प्रकारचे कार्यालयीन अथवा प्रक्षेत्रविषयक कामे न करता लेखणी बंद आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, कुलसचिव रणजीत पाटील यांना निवेदन देखील देण्यात आले. त्याद्वारे कृषि विद्यापीठाला सातवा वेतन आयोग लागु करण्यासंदर्भात समन्वय संघाने आत्तापर्यंत विद्यापीठाच्या स्तरावर व शासन स्तरावर वेळोवेळी निवेदने यापूर्वी दिले आहेत. मात्र, शासन आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
'अन्य कृषी विद्यापीठातही आंदोलन'
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने आंदोलनाबाबत राज्यातील अन्य चारही कृषि विद्यापीठातील कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांशी ऑनलाईन बैठकीत चर्चा केली. त्यानुसार या लेखणी बंद आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. सर्व अधिकारी-कर्मचार्यांनी सकाळीच प्रशासकीय इमारतीसमोर एकत्रित येतच आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू केला.
'बेमुदत लेखणीबंद आंदोलन'
दरम्यान, 2 नोव्हेंबपासून लेखणीबंद आंदोलन सुरू असून, 5 नोव्हेंबरपर्यंत हे आंदोलन चालणार असल्याची माहिती यावेळी विद्यापीठ समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांनी दिली. तर पुढच्या टप्प्यात 6 नोव्हेंबर रोजी सर्व अधिकारी-कर्मचारी एक दिवस सामुहिक रजा देवून आंदोलन करतील. त्यानंतर 7 नोव्हेंबरपासून रोजी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करणार आहोत, असेही मोरे म्हणाले.