परभणी- गेल्या 3 दिवसांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे. ज्या ऑनलाईन सेंटरवरून ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. त्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असून गेल्या 3 दिवसात केवळ 13 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
त्यामुळे शहरातील शिवाजी महाविद्यालयात गेल्या 3 दिवसांपासून हजारो विद्यार्थी आणि पालक फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ प्रवेश प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
यावर्षी शासनाने बारावीनंतरच्या विविध कोर्सेससाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. मात्र, ही प्रक्रिया प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र न ठेवता सामायिक केली आहे. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुविशारद, वैद्यकशास्त्र तसेच इतर 53 शाखेचे प्रवेश या एकाच पोर्टलवरून करून घेतले जात आहेत. यासाठी प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र, प्राथमिक फेरीतच असा गोंधळ उडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.