परभणी- जिल्ह्यात 'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करून देखील नागरिकांकडून सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस दलाने अशा लोकांवर पुन्हा एकदा कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलिसांनी गेल्या 2 दिवसांत तब्बल 1 हजार 5 जणांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई करून 1 लाख 30 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
परभणीत मास्क न वापरणाऱ्यांकडून 1 लाख 30 हजारांचा दंड वसूल; 1 हजार 5 जणांवर कारवाई - परभणी अनलॉक
परभणी पोलिसांनी गेल्या 2 दिवसांत तब्बल 1 हजार 5 जणांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई करून 1 लाख 30 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
परभणी जिल्ह्यात व सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी वावरताना आवाहन करुन सुद्धा बरेचसे नागरिक मास्कचा वापर करीत नाहीत. म्हणून परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे मागील दोन दिवसांपासून मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. मागील 2 दिवसांत एकूण 1 हजार 5 जणांवर कार्यवाही करुन 1 लाख 30 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबाबत पोलिसांनी न्यायालयात 165 खटले दाखल केले आहेत. त्यापैकी 94 प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी दिली आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे व कोरोनाचा संसर्ग स्वतः व समाजास होणार नाही, याची काळजी घ्यावी. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही शेळके यांनी सांगितले.