परभणी -जिल्हा परिषदेचे सीईओ पृथ्वीराज बी. पी. यांनी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयात धडक कारवाई केली. १० वीच्या परीक्षेदरम्यान होत असलेल्या सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकारास जबाबदार असलेल्या केंद्रसंचालकासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओंनी दिले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान बुधवारी भूमितीचा पेपर होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्या नेतृत्वात भरारी आणि बैठ्या पथकाने एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. परीक्षा सुरू असताना सीईओ बी. पी. पृथ्वीराज यांच्यासह पथकातील गटविकास अधिकारी एस. आर.कांबळे, औरंगाबाद विभागाचे अधीक्षक ए.बी.जाधव, पर्यवेक्षक के.एम.अंबुलगेकर, एस. डी. ससाणे यांचे भरारी पथक आणि बैठे पथकातील ज्योती गऊळकर, बी.एल.रब्बेवार, जी.डी गायकवाड, एस.के.बंडेवाड परीक्षा केंद्रात पोहोचले.