परभणी- जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 66.27 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक जिंतूरमध्ये 72 टक्के झाले. तर सर्वात कमी मतदान परभणीत 60.92 टक्के झाले आहे. याशिवाय गंगाखेड 63.29 तर पाथरीसाठी 68.50 टक्के मतदान झाले. दरम्यान, 41 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीन बदलावे लागले.
तसेच 6 ठिकाणच्या ईव्हीएम देखील बदलण्यात आल्या. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत मतदान पार पडले. परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये मिळून 13 लाख 99 हजार 562 एवढे मतदार आहेत. यापैकी संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या मतदान प्रक्रियेत जवळपास 10 लाख मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.
हेही वाचा - परभणीतील सखी मतदान केंद्र चिखलात, मतदारांची कसरत
दरम्यान, जिल्हा निवडणूक प्रशासनाने सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीनुसार परभणी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 6 हजार 299 मतदारांपैकी 1 लाख 74 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 91 हजार 758 पुरुष असून 82 हजार 346 महिला मतदार आहेत. तसेच जिंतूर मतदारसंघात 3 लाख 50 हजार 834 पैकी 1 लाख 19 हजार 114 पुरुष मतदारांनी तर 1 लाख 14 हजार 701 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याप्रमाणेच गंगाखेड मतदारसंघात 3 लाख 88 हजार 662 मतदारांपैकी 1 लाख 19 हजार 545 पुरुष तर 1 लाख 13 हजार 219 महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 53 हजार 767 पैकी 1 लाख 14 हजार 473 पुरुष आणि 1 लाख 5 हजार 551 महिला मतदारांनी मतदान केले.