परभणी- आषाढी एकादशीनिमित्त विठुनामाच्या गजरात परभणीसह पूर्ण नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. दोन्ही शहरात मुख्य मार्गाने बालगोपाळांची दिंडी काढण्यात आली होती. यावेळी विविध संतांच्या वेशभूषा सादर केलेले बालगोपाल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. परभणीत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गेल्या 37 वर्षांपासून ही दिंडी काढण्यात येते, तर पूर्णा येथे पार पडलेल्या रिंगण सोहळ्याने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
विठू नामाच्या गजराने परभणीसह पूर्णानगरी दुमदुमली; बालगोपालांची दिंडी उत्साहात
आषाढी एकादशीनिमित्त विठुनामाच्या गजरात परभणीसह पूर्ण नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. दोन्ही शहरात मुख्य मार्गाने बालगोपाळांची दिंडी काढण्यात आली होती. यावेळी विविध संतांच्या वेशभूषा सादर केलेले बालगोपाल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
परभणी शहरात आषाढी एकादशीनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्यावतीने गेल्या 37 वर्षापासून सुरू केली गोपाल दिंडीची परंपरा यावर्षीही कायम राहिली. बालगोपाळांसह भाविक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी विठुनामाच्या जय घोषाने परभणी नगरी दुमदुमली. या गोपाळ दिंडीत शहरातील विविध शाळानी सहभाग घेतला होता. माळी गल्लीतील हनुमान मंदिरापासून दिंडीस प्रारंभ झाला. मुख्य रस्त्याने काढण्यात आलेल्या या दिंडीत हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. गुजरी बाजारात या बालवारकऱ्यांनी रिंगण करून भाविकांची मने जिंकली. ही दिंडी नारायण चाळ, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठमार्गे जात विद्या नगरातील माऊली मंदिरात विसर्जीत झाली.
या प्रमाणेच पूर्णा शहरात आषाढी एकादशीनिमित्त कै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्यावतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नवा मोंढा परिसरात वारकरी, दिंड्या, भजनी मंडळे महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शेकडो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीची महापूजा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम व मान्यवरांच्या हस्ते झाली. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात पालखी भव्य मिरवणूक म.बसवेश्वर चौक, शिवाजी महाराज चौक, महादेव मंदिर, परिसरातून विठू नामाचा गजर करत जुना मोंढा भागातील श्रीराम मंदिर परिसरात पोहचली. यावेळी अनेकांनी फुगडीचा ठेका ही धरला. विद्यार्थ्यांनी विठूरायांचा मेळा, वारकऱयांची वेशभुषा परिधान केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.