परभणी - 'जरासं पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे. आयपीएलची चर्चा जोरात आहे, पण इकडे शेतकरी देखील संकटात आहे. जरा पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे...' अशी आर्तता व्यक्त करणारी आणि शेतकऱ्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे झालेली दुरवस्था मांडणारी कविता सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेल्या मिरखेल येथे उमेश देशमुख या तरुण शेतकऱ्याने आपली व्यथा सांगणारी ही कविता सादर केली आहे. त्यातून शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी राहिली नसेल तर नवलच.
सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील तब्बल 47 हजाराहून अधिक हेक्टर जमीन बाधित झाल्याची प्राथमिक आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक भागातील पंचनामे आणि सर्वे अद्याप बाकी असल्याने बाधित शेतीचा आकडा हा सुमारे सव्वा लाख हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातून गोदावरी, दुधना आणि पूर्णा या प्रमुख नद्या वाहतात. या तीनही नद्यांच्या पत्रात वरच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने सुमारे 15 दिवस या नद्यांना पूर होता. त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये हे पाणी शिरून हजारो एकर जमीन बाधित झाली आहे. ज्यामध्ये सोयाबीन, कापसाच्या गंजी वाहून गेल्या. पिकांना कोंब फुटले. शिवाय सोयाबीन, कापसासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार नुकसानीचा आकडा हा हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. असे असताना अद्याप शेतकऱ्याला दमडीचीही मदत जाहीर झालेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.