परभणी - जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या ४ मतदारसंघातून 81 उमेदवारांचे 109 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. याठिकाणी महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि काही अपक्षांमध्ये लढत होणार आहे. विशेष म्हणजे सेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी आव्हान ठेवले आहे. मात्र, सोमवारी त्यातील कोणते उमेदवार माघार घेतात? यावर विधानसभेच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघासाठी 27 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी ४ अर्ज बाद झाल्याने 17 उमेदवारांचे 23 अर्ज पात्र ठरले आहेत. याप्रमाणेच परभणी मतदारसंघातील 37 पैकी 3 अर्ज बाद झाल्याने 27 उमेदवारांचे 34 अर्ज वैध ठरले आहेत. तसेच गंगाखेड मतदारसंघातील 42 अर्जांपैकी 17 अर्ज बाद झाल्याने 23 उमेदवारांचे 35 अर्ज वैध ठरले आहेत. याशिवाय पाथरी मतदारसंघातील 19 अर्जांपैकी 2 अर्ज बाद झाल्याने 14 उमेदवारांचे 17 अर्ज वैध ठरले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये 81 उमेदवारांचे 109 अर्ज वैध ठरले आहेत.
हेही वाचा - पाथरीचे आमदार मोहन फडांना शक्ती प्रदर्शन पडले भारी; व्यासपीठच कोसळले, कार्यकर्त्यांचा गोंधळ
दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक विभागाने मुदत दिली आहे. त्यादिवशी वरील 81 पैकी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, यावर परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचे चित्र स्पष्ट होणार आहे. परभणी जिल्ह्यात शिवसेना, भाजप आणि मित्र पक्षांच्या युतीची काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत लढत होत आहे. शिवाय या ठिकाणी वंचित व अपक्षांनी देखील आपले उमेदवार देऊन युती तसेच आघाडीसमोर आव्हान निर्माण केले आहे. या चारही पक्षांमध्ये होणाऱ्या लढतीत नेमकं कोण बाजी मारतं? हे निकालानंतर स्पष्ट होईल. तसेच महायुतीच्या उमेदवाराला गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी या ३ ठिकाणी बंडखोरांचे कडवे आव्हान असणार आहे. तर, परभणीत आघाडीच्या उमेदवाराला बंडखोराशी झुंज द्यावी लागणार, असे चित्र आहे.
विधानसभा निहाय उमेदवार आणि त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे -
पाथरी मतदारसंघ -
मोहन फड (भाजप), सुरेश वरपुडकर (काँग्रेस), गौतम उजगरे (बहुजन समाज पार्टी) अजय सोळंके (आंबेडकर वादी रिपब्लिकन पार्टी), मोईज अन्सारी (बहुजन मुक्ती), विलास बाबर (वंचित बहुजन आघाडी), नारायण चव्हाण (अपक्ष), डॉ. जगदीश शिंदे (अपक्ष), जयराम विघ्ने (अपक्ष), प्रल्हाद पाटील (अपक्ष), मुजमिल आलम (अपक्ष), मुंजाजीराव कोल्हे (अपक्ष), राम शिंदे (अपक्ष) आणि डॉ. संजय कच्छवे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा - परभणीत मोहन फड 'रिपाइं'चे तर मेघना बोर्डीकर 'रासप'च्या उमेदवार; कमळ फुलणार नाही