परभणी - जिल्ह्यात सोमवारी आणखी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 149 झाली आहे. त्यातील 98 जण कोरोनामुक्त झाले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 47 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 3 दिवसांपासून यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आज सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झालेल्या अहवालात आणखी 7 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सरफराज नगर येथील 28 वर्षीय महिला व 33 वर्षीय पुरुष असे दोन रुग्ण आहेत. तर परभणी तालुक्यातील झरी येथील 28 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष असे दोन आहेत. तसेच गंगाखेड येथील पूजा मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेसह, गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा येथील 55 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. याशिवाय मानवत येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हेही वाचा - कोरोनाचा म्हाडाला 'असा'ही फायदा; बीडीडी चाळीतील रहिवाशांचा स्थलातरांला होकार
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 791 संशयितांची नोंद करण्यात आली आहे. यातील 2 हजार 694 जणांच्या स्वॅबचे नमुने निगेटिव्ह आहेत. तसेच 89 जणांचे अहवाल अनिर्णयक असून, 47 स्वॅबचे नमुने तपासण्याची आवश्यकता नाही, असा अहवाल नांदेडच्या प्रयोग शाळेने दिलेला आहे. गेल्या 2 आठवड्यापासून वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी 3 दिवसांची संचारबंदी जाहीर केली होती. पुन्हा त्यात वाढ करून पुढील तीन दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार आता बुधवारी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील नागरी भागात संचारबंदी असणार आहे. या संचारबंदीतून सोनपेठ आणि जिंतूर शहरांना वगळण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेतच बाजारपेठ सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.
आज जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी गंगाखेड येथील पूजा मंगल कार्यालय परिसर व तालुक्यातील सेलमोहा आणि मानवत पोलिस वसाहत परिसरास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर केले. याप्रमाणेच परभणी शहरातील आजिजीया नगर देखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तर तालुक्यातील झरी या गावात यापूर्वी आढळलेल्या रुग्णांमुळे संचारबंदी लागू आहे. तसेच संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून देखील जाहीर करण्यात आले आहे.