परभणी - सेलू येथील एका महिलेला नांदेड येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान काल बुधवारी संबंधीत महिला ही करोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही महिला ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली होती, त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबातील 8 जण, त्यांच्या संपर्कातील 23 जण, असे एकूण 31 व्यक्ती आणि परभणीतील रुग्णालयात संपर्कात आलेले 30जण, अशा एकूण 61 जणांना जिल्हा प्रशासनाने क्वाॅरंटाईन केले आहे. तसेच त्यांचे स्वॅब (घशातील स्त्रावाचे नमुने) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा...लॉकडाऊन : विस्थापित कामगारांचे कुटुंब २२ दिवसांनी पोहोचले घरी; ६०० किलोमीटर केला पायी प्रवास..
महत्वाचे म्हणजे ही महिला नांदेडला जाण्यापूर्वी परभणीत एका खासगी रुग्णालयामध्ये दोन तास थांबल्याची माहिती मिळताच मनपा प्रशासनाने ते रुग्णालय सील केले आहे. संबंधित रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी संबंधीत महिला आपल्या रुग्णालयामध्ये आली नसल्याचा दावा केला होता. मात्र, त्या महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई होत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
चार महिन्यांपूर्वीच ही महिला औरंगाबादमध्ये एका रुग्णालयात उपचारार्थ आली होती. 26 एप्रिल रोजी सेलूला परतल्यानंतर त्या महिलेस अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांनी परभणीतील मोंढा भागातील एका खासगी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तेथून त्या महिलेस नांदेडला नेण्यात आले. त्यानंतर नांदेडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेचे स्वॅब (घशातील स्त्रावाचे नमुने) तपासणीसाठी घेतले. तेव्हा ही महिला कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
नांदेड आरोग्य विभागाने या महिलेच्या दोन मुलांना लगेचच क्वाॅरंटाईन केले आहे. तसेच महिलेच्या कुंटुंबातील आणि संपर्कातील अन्य काही व्यक्ती, अशा एकूण 61 जणांना क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचेही स्वॅब घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.