परभणी - आडत मालकांनी दिलेला धनादेश वटवून बँकेबाहेर पडलेल्या मुनिमाच्या हाताला झटका देऊन एका चोरट्याने ५ लाख रुपयांची बॅग लंपास केली आहे. ही घटना मानवत येथील भारतीय स्टेट बँकेच्या बाहेर घडली आहे. दरम्यान, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोराचा शोध घेत आहेत.
मानवतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; बँकेबाहेरच हाताला झटका देऊन ५ लाख रुपये केले लंपास - parbhani
बँकेच्या बाहेर भरत पारखे आणि रमेश कदम हे रक्कम घेऊन मोंढ्याच्या दिशेने जाण्यासाठी दुचाकी वाहनावर स्वार झाले. क्षणार्धात या दोघा मुनीमांच्या हातातील रक्कम एका चोरट्याने हिसकावून घेत पलायन केले.
आडत दुकानदार वामन नारायण कोकर यांनी शुक्रवारी दुपारी आपल्या मुनीमास बँकेतून रक्कम आणण्यासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. त्यानुसार आडत दुकानावर काम करणारे भरत अमृत पारखे आणि रमेश मुरलीधर कदम यांनी मानवत येथील मध्यवस्ती असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत हा धनादेश देऊन ५ लाख रुपयांची रोकड घेतली. या बँकेपासूनच अज्ञात चोरटे या दोघांवर पाळत ठेवून होते. बँकेच्या बाहेर मुनीम भरत अमृत पारखे आणि रमेश कदम हे रक्कम घेऊन मोंढ्याच्या दिशेने जाण्यासाठी दुचाकी वाहनावर स्वार झाले. क्षणार्धात या दोघा मुनीमांच्या हातातील रक्कम एका चोरट्याने हिसकावून घेत पलायन केले.
या घटनेनंतर पाठलाग करुनही चोरटे हाती लागले नाहीत. यानंतर बँकेमध्ये रक्कम घेतेवेळी कोणकोण आले होते, यासाठी पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन अधिक तपास करीत आहेत. चोरट्याचा तपास घेण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले. मात्र, कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. या घटनेमुळे मानवत शहरात एकच खळबळ उडाली.