परभणी - गेल्या काही दिवसात परभणीच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. आज (सोमवार) शहराचे तापमान 5.6 अंश सेल्सिअस इतके निचांकी नोंदवण्यात आले आहे. यामुळे उन्हाळ्यात प्रचंड तापमानाचे चटके सहन करणाऱ्या परभणीकरांना आता हिवाळ्यातदेखील बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतो आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्याचा सहारा घेत आहेत. तसेच स्वेटर, मफलर, कानटोपी घालूनच घराबाहेर पाडताना दिसत आहेत.
'पारा आणखी घसरणार...!'
परभणी जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी जाणवू लागली होती. मात्र, ऐन दिवाळीत तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील गारवा नाहीसा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तापमानात घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीचे किमान तापमान 10 अंशाच्या खाली आले आहे. आज (सोमवार) तर निच्चांकी तापमान 5.6 अंशावर आल्याने रात्री आणि सकाळच्या सुमारास कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. दरम्यान, या मौसमात निच्चांकी तापमानाची आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागात नोंद झाली आहे. या वर्षातील सर्वात कमी तापमान असून, यापुढे तापणात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाचे प्रमुख डॉ.कैलास डाखोरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी तापमानाचा पारा खाली उतरून यापूर्वीचा किमान तापमानाचा रेकॉर्ड ब्रेक होते का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
'कालव्यामधील पाण्यामुळे गारठ्यात वाढ'
परभणी शहराचे तापमान गेल्या काही वर्षापासून कमालीचे खाली उतरत आहे. 2018 च्या हिवाळ्यात शहराचे तापमानाचा पारा 2 अंशापर्यंत खाली उतरला होता. यंदा देखील तापमानाचा पारा अशाच पद्धतीने खाली जाण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला होता. ज्यामुळे जिल्ह्याची पाणी पातळी देखील वाढली आहे. अनेक प्रकल्प 100 टक्के भरलेले आहेत. शिवाय जिल्ह्यातील डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ज्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात आले आहे. कालव्यातील पाण्यामुळेही थंडीत वाढ झाली आहे.