परभणी - जिल्ह्यात सध्या 44 'कोरोना' संशयित व्यक्तींना जिल्हा प्रशासन तथा आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. यापैकी 29 नागरिक परदेशदौरा करून आले आहेत. आतापर्यंत 31 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यातील 16 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 8 अहवाल नाकारण्यात आले. मात्र, अद्याप 7 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. तसेच जिल्ह्यातील 90 हजार परिवार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
परभणीत 44 कोरोना संशयित आरोग्य विभागाच्या निगराणीत हेही वाचा -कोरोनाच्या प्रभावात राज्याची उपराजधानी लॉक डाऊन
जगात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात आज (शनिवारी) जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ पृथ्वीराज बी.पी., अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, परभणी जिल्ह्यात संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत परदेशातून आलेल्या 29 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्या घशामधील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 31 लोकांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यातील 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तर आणखी 7 लोकांचे अहवाल येणे बाकी आहेत. एकूण सध्या 44 लोक आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहेत. याशिवाय इतर अनेक लोकांना संशय वाटल्यामुळे त्यांच्या घरी 'होम क्वारन्टाईन' करण्यात आले आहे.
हेही वाचा -दिलासादायक! कंपन्यांनी साबणांच्या किमती कमी करून वाढविले उत्पादन
दरम्यान, परभणी जिल्ह्यात अंगणवाडी आणि आशासेविका यांच्यामार्फत आत्तापर्यंत 90 हजार घरांची तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी पुणे-मुंबई तसेच परदेशातून आलेले लोक आढळून आले, त्यांना आरोग्य तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परदेशातून आलेल्या सर्वांनाच 14 दिवस 'होम क्वारंटाईन' बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाच्या जनजागृतीसाठी बस स्थानक, रेल्वे स्थानक, बँका, गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या हातावर निर्जंतुकीकरण औषध मारून उपाययोजना केल्या जात आहेत.
आज (शनिवारी) जिल्ह्यातील सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये किराणा, पेट्रोल आणि औषधी दुकाने वगळण्यात आली आहेत. तर उद्या (रविवारी) मात्र जनता कर्फ्यु असेल. रेल्वे, बसेस आणि सर्वच यंत्रणा बंद राहणार आहेत. या 14 तासात लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुगळीकर यांनी केले. याशिवाय रविवारपासून तूर, कापूस, खरेदी देखील बंद ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व गाड्या, बसेस बंद असतील. दरम्यान, शहरात स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. विशेषतः भिकार्यांना ताब्यात घेऊन त्यांची योग्य ठिकाणी व्यवस्था करण्यात येत असल्याचेही मुगळीकर यांनी सांगितले.