परभणी - शहरात तसेच जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार होणाऱ्या कारवायांमुळे गुटखा माफियांचे मोठे जाळे पसरल्याचे दिसून येत आहे. आज (मंगळवारी) पोलिसांनी अशाच एका गुटखा माफियावर छापा टाकून त्याच्या घरातून सुमारे ४ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्याच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
परभणीत गुटखा माफियावर पोलिसांचा छापा; ४ लाखांचा गुटखा जप्त - परभणी
शहरात तसेच जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार होणाऱ्या कारवायांमुळे गुटखा माफियांचे मोठे जाळे पसरल्याचे दिसून येत आहे. आज (मंगळवारी) पोलिसांनी अशाच एका गुटखा माफियावर छापा टाकून त्याच्या घरातून सुमारे ४ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्याच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
शेख समयोद्दीन शेख बशीर अहमद (रा. कडवी मंडी) असे या गुटखा माफियाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, त्याच्या कडवी मंडीतील घरात गुटखा साठवून ठेवला होता. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार करून त्याच्या घरावर अचानक छापा टाकला. तेव्हा घरातील त्याच्या बेडरूममध्ये पलंगाखाली मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या पुड्या मिळून आल्या. यात एकूण १३७५ गुटख्याच्या पुड्या असून ज्यामध्ये सितार, वजीर, राजनिवास सुगंधी पानमसाला, बॉम्बे गुटखा, जाफरानी जर्दा, पान पराग या गुटख्याचा समावेश आहे.
विशेष म्हणजे आरोपी अंडी विकण्याचे काम करायचा, अंडी विकणारा हा अंधारात अवैद्य गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री करतो. दरम्यान, किरकोळ व्यापार करत असल्याचे भासवून गुटख्याचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणाऱ्यांची शहरात संख्या मोठी आहे. हातगाडी, चहाची टपरी चालवत असल्याचे दाखवून गुटख्याचा व्यवसाय केला जातो, जेणेकरून पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाचे आपल्याकडे लक्ष जाऊ नये, हा यामागे उद्देश असल्याचे दिसून येते.