परभणी - विविध लहानमोठ्या व्यवसायानिमित्ताने परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये राहणारे मजूर लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. त्यापैकी बहुतांश परप्रांतीय नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत रवाना केले जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून या अंतर्गत शनिवारी उत्तर प्रदेशातील 381 मजुरांना औरंगाबाद येथे सोडण्यात आले आहे. त्या ठिकाणाहून ते विशेष रेल्वेने आपल्या स्वजिल्ह्यात परतणार आहेत. याप्रमाणेच मध्यप्रदेशातील देखील 44 मजूर रवाना करण्यात आले आहेत.
LOCKDOWN : परभणीतून उत्तर प्रदेशातील 381, तर मध्यप्रदेशच्या आणखी 44 मजुरांची रवानगी - परभणी कोरोना
लॉकडाऊनमुळे परभणीत हजारो परप्रांतीय अडकले आहेत. त्यात उत्तर प्रदेश राज्यातील 381 मजूर जिल्ह्यातील विविध भागात लॉकडाऊनमुळे अडकले होते. शनिवारी त्या मजुरांची जिल्ह्यातील आठ तालुक्यातून 17 बसद्वारे मोफत प्रवासाची सोय करण्यात आली
संपूर्ण जगात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार उडाला आहे. यामध्ये स्थलांतरीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महाराष्ट्रात व्यवसाय, व्यापाराच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा व इतर राज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. याप्रमाणे परभणीत देखील हजारो परप्रांतीय अडकले आहेत. त्यात उत्तर प्रदेश राज्यातील 381 मजूर जिल्ह्यातील विविध भागात लॉकडाऊनमुळे अडकले होते. शनिवारी त्या मजुरांची जिल्ह्यातील आठ तालुक्यातून 17 बसद्वारे मोफत प्रवासाची सोय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांना जिल्ह्यातील 8 बसस्थानकातून रवाना करण्यात आले. त्यानुसार परभणी तालुक्यातील 29 मजूर एका बसमधून तर पूर्णा बस आगारातील चार बसमधून 93, सेलू बस आगारातील तीन बसमधून 65, जिंतूर बस आगारातील एका बसमधून 23, मानवत बस आगारातील एका बसमधून 25, पाथरी बस आगारातील तीन बसमधून 58, गंगाखेड बस आगारातील तीन बसमधून 66 तर सोनपेठ बस आगारातील एका बसमधून 22 अशा उत्तर प्रदेशातील 381 मजुरांना औरंगाबाद रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण 17 बसेसमधून रवाना करण्यात आले. या शिवाय शुक्रवारी रात्री दोन बसमधून मध्यप्रदेशातील 44 कामगारांना महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील बुऱ्हाणपूरपर्यंत रवाना करण्यात आले होते.