परभणी -जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आजपासून तीन दिवस जिल्ह्यातील शहरांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. आज पहिल्या दिवशी शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी ठिकाणी नाकेबंदी केली होती. नागरिकांनी देखील घरात राहून स्वयंस्फूर्तीने या संचारबंदीला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.
परभणी जिल्हा हा लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला दीड महिना ग्रीनझोनमध्ये होता. मात्र, आता कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्याच्या 12 सीमा बंद करण्यात आल्या होत्या. सीमावर्ती भागातील 83 गावांमध्ये पथके तयार करून रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे परभणी जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत केवळ शंभर रूग्ण आढळले. त्यातील 90 रूग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत.
मात्र, मागच्या आठवडाभरात 20 पेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरूवारी एक आदेश जारी करून शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस परभणी महानगरपालिका क्षेत्रासह परिसरातील पाच किलोमीटर तर आठही नगरपालिका व त्यांच्या परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्रात संचारबंदीचे आदेश लागू केले. आजपासून आदेशांची अंमलबजावणी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर परभणी शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.