परभणी - वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात आणखी 3 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये मात्र, 7 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नुकतेच आदेश बजावले आहेत.
परभणी जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून अचानक कोरोनाबधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या चार दिवसात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनात चिंता निर्माण झाली आहे. त्याामुळे जिल्हाधिकार्यांनी प्रत्येक शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून ही संचारबंदी सुरू असतानाच पुन्हा आज (रविवार) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवीन आदेश बजावले आहेत. त्यांनी जिल्ह्यात आणखी 3 दिवस संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील गंगाखेड वगळता इतर 8 तालुक्यांच्या शहरी व ग्रामीण भागांमध्ये आज मध्यरात्रीपासून बुधवारी (15 जुलै) मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी वाढवली आहे. तसेच गंगाखेड शहरात व संपूर्ण ग्रामीण भागात शुक्रवार (19 जुलै) पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, गंगाखेड, परभणी, सेलू, मानवत, पूर्णा आदी शहरांसह ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एकट्या गंगाखेड तालुक्यात 3 दिवसात 30हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गंगाखेड शहरात 28 जून रोजी पार पडलेल्या एका उद्योजकाच्या मुलाचा शाही विवाह स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यातून हा कोरोनाचा फैलाव वाढला आहे. जवळपास 40हून अधिक रुग्ण बाधित, झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, त्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधे आणि इतर काही सेवांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था आणि आरोग्य संदर्भातील सेवांना सूट देण्यात आली आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालये व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, आपतकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, राष्ट्रीयकृत बँका, केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चालनद्वारे रोकड भरणा तसेच ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दूध विक्रेते यांना सकाळी 6 ते 9 या वेळात संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे.