परभणी - सेलू शहरातील 45 वर्षीय महिलेचा आज (मंगळवारी) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुुळे परभणी जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 3 झाली आहे.
दरम्यान, ही महिला मुंबई येथून मागील आठवड्यात सेलू येथे आल्यानंतर तिला सेलूतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
मृत महिला सेलू येथील राजीव गांधी नगरातील रहिवासी आहे. मात्र, कामानिमित्त तिचे कुटुंब मुंबईला राहत होते. कोरोनाच्या संसर्गामुळे ती मागील आठवड्यात सेलू येथे परतली होती. तिला काही शारीरिक व्याधी असल्याने सेलूच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिची प्रकृती बिघडत असल्याने डॉक्टरांनी परभणीत हलविण्याचा सल्ला दिला होता.
त्यानुसार तिला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, याठिकाणी तिचा त्रास वाढत असल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यामुळे 3 दिवसांपूर्वी तिच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी नांदेडच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. त्याचा अहवाल आज सकाळी येऊन धडकला असून त्यात ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर काही वेळातच या महिलेचा मृत्यू झाला.
या महिलेला अन्य काही व्याधी असल्याने ती कोरोनाचा सामना करू शकली नाही. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. तर याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, सदर महिलेवर परभणीत अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या महिलेच्या सोबत मानवत शहरातील एका 44 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याची प्रकृती मात्र स्थिर असल्याचे सांगण्यात येते. या महिलेच्या मृत्यूनंतर परभणी जिल्ह्यातील करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आता 3 एवढी झाली आहे.