परभणी- परभणीच नव्हे तर पंचक्रोशीतील जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील नवरात्र उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट दिसून येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने ऑनलाइन दर्शनाची सुविधा केली आहे. मात्र, असे असले तरी अनेक भक्त प्रत्यक्ष येवून दर्शनासाठी धडपडताना दिसत आहेत. मंदिरामध्ये सर्व धार्मिक विधी होत असल्या तरी भाविकांना १० ते १५ फूट अंतरावर असलेल्या गाभाऱ्याच्या एका माळगीतून देवीचे केवळ मुखदर्शन दिल्या जात आहे.
देवी साहेब संस्थान अर्थात जगदंबेच्या या मंदिरात यंदा भाविकांविनाच घटस्थापनेच्या दिवशी शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोना विषाणूमुळे नवरात्रौत्सवाची तब्बल अडीचशे वर्षाची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गुलाबचंद राठी, भगवान देशमुख व इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पुजाऱ्यांच्या उपस्थित जगदंबेच्या गाभार्यात विधिवत घटस्थापनेची पूजा केली. त्यानंतर १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान दररोज पहाटे देवीचा अभिषेक, महापूजा आणि त्यानंतर महानैवेद्य, तसेच सकाळ-संध्याकाळ आरती, अनुष्ठान, गणपती अथर्वशीर्ष, दुर्गा सप्तशती, श्रीसुक्त पाठ, यजुर्वेद संहिता पारायण, भवानी सहस्त्रनाम, विडा-पाळणा प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रमे नित्यनियमाने आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी एकाही धार्मिक कार्यक्रमास भाविकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.