महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांना राज्यभरातून 21 लाख राख्या पाठविणार ; भाजप महिला उपाध्यक्षा रेखा कुलकर्णींची माहिती - महिला सक्षमीकरण

शक्ती सन्मान महोत्सव या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांकडून 21 लाख राख्या मुख्यमंत्र्यांसाठी पाठवल्या जाणार आहेत. भाजपच्या महिला पदाधिकारी प्रत्येक बुथ मध्ये फिरून प्रत्येक घरातील महिलेकडून मुख्यमंत्र्यांसाठी राखी घेणार आहेत.

भाजप महिला उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी

By

Published : Jul 31, 2019, 5:44 PM IST

परभणी - महिलांचा सन्मान करण्यासाठी भाजपच्यावतीने संपूर्ण राज्यात शक्ती सन्मान महोत्सव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पत्र घराघरात पोहोचवण्यात येणार आहे. प्रत्येक घरातील महिलेकडून मुख्यमंत्र्यांसाठी राखी घेतली जाईल. या उपक्रमातून 21 लाख राख्या मुख्यमंत्र्यांसाठी जाणार आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप महिला उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी
हा एक महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय असल्याचा विश्वास भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी यांनी आज (बुधवारी) परभणीत व्यक्त केला. या उपक्रमाबाबत परभणी शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, अभय चाटे, महिला जिल्हाध्यक्ष गीतांजली आहेर, मंगला मुदगलकर, मीना परतानी, जयश्री जामगे आदीं पदाधिकारी उपस्थित होते. रेखा कुलकर्णी म्हणाल्या, संपूर्ण राज्यभरातून मुख्यमंत्र्यांसाठी 16 ऑगस्ट पूर्वी या राख्या पाठवण्यात येणार आहेत. यापूर्वी भाजपच्या महिला पदाधिकारी प्रत्येक बुथ मध्ये फिरून महिलांना मुख्यमंत्र्यांचा संदेश देणार आहेत. यामध्ये भाजप सरकारने केलेल्या कामांची तसेच महिलांसाठी असलेल्या विशेष योजनांची माहिती असणार आहे. तसेच महिलांच्या काही अपेक्षा असतील तर त्या देखील मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या राखी सोबत महिलांना एक पत्र पाठवता येणार आहे. या उपक्रमासाठी आम्ही कुठलाही भेदभाव करणार नाही. कारण मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घरातून जरी मुख्यमंत्र्यांसाठी राखी मिळाली, तरी आम्ही ती घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत. प्रत्येक मंडळातून साधारणपणे 1 हजार राख्या जमा करण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्रातून 21 लाख राख्या याव्यात, अशी अपेक्षा असल्याचे रेखा कुलकर्णी म्हणाल्या. विशेषतः मुस्लिम भगिनींकडूनही मुख्यमंत्र्यांसाठी राख्या मिळत आहेत. तीन तलाक सारख्या विधेयकाला मंजुरी देऊन भाजप सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. त्यामुळे या महिला देखील भाजप सरकारवर समाधानी असल्याचा दावा देखील रेखा कुलकर्णी यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details