महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत प्लास्टिक बंदीनंतरही पाणी पाऊचचा धंदा जोरात; दोनशे पोती प्लास्टिक जप्त

सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर परभणी महापालिकेने यासंबंधी कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकामार्फत बाजारपेठेत फिरून अनेकवेळा किराणा दुकान तसेच इतर ठिकाणी धाडी टाकत शेकडो क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.

प्लास्टिक बंदीनंतरही पाणी पाऊचचा धंदा जोरात

By

Published : Nov 21, 2019, 10:02 AM IST

परभणी- प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही परभणी शहरात मात्र पाणी पाऊचचा धंदा जोरात सुरू आहे. याबद्दल माहिती मिळताच मनपाच्या पथकाने चार ठिकाणी धाडी टाकत पाणी पाऊचचे 200 पोते जप्त केले आहेत. शिवाय त्या पाणी कंपन्यांकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, यापुढे जर पाणी पाऊच आढळल्यास थेट गुन्हे दाखल करून कारवाई करू, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा -सावरकरांचा द्वेष करणाऱ्यांसोबत जाणाऱ्यांनी विचार करावा; भाजपचा शिवसेनेला टोला

शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर परभणी महापालिकेने यासंबंधी कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकामार्फत बाजारपेठेत फिरून अनेकवेळा किराणा दुकान तसेच इतर ठिकाणी धाडी टाकत शेकडो क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. लाखो रुपयांचा दंडही वसूल केला. सुरुवातीला तर काही लोकांचे आठ ते दहा दिवस दुकाने सील ठोकल्याने बंद राहिली. या कारवाईच्या दणक्यामुळे परभणी शहरातील बाजारपेठेत वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर बर्‍यापैकी आळा बसला आहे. असे असले तरी प्लास्टिक पिशव्यांमधून विकले जाणारे पाणी मात्र सर्रास सर्वत्र उपलब्ध होत होते.

पाणी पाऊच बनवणाऱ्या कंपन्यांचा धंदा राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार आयुक्त रमेश पवार यांच्याकडे आली होती. यासंबंधी त्यांनी तात्काळ पथक प्रमुख तथा स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड व विनय ठाकूर यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार परभणी शहरातील गंगाखेड रोडवर असलेल्या एक्वा फाईन पाणी पाऊच कंपनीवर धाड टाकण्यात आली. तसेच या ठिकाणाहून जवळ असलेल्या डॉल्फिन एक्वा या पाणी कंपनीवर देखील धाड टाकून त्यांच्याकडून एकूण दीडशे पोते पाणी पाऊच जप्त करण्यात आले आहेत. शिवाय त्यांना 10 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला.

हेही वाचा -भाजप-शिवसेनेची महायुती तुटल्यानंतर अमित शाह प्रथमच महाराष्ट्रात

याप्रमाणेच जुना मोंढा भागातील शेख इब्राहिम या पाणी विक्रेत्यावर धाड टाकण्यात आली. तसेच येथून जवळच असलेल्या ताडकळसकर या देशी दारूच्या दुकानात देखील धाड टाकत त्यांच्याकडून एकूण 45 पाणी पाऊचची पोते जप्त करण्यात आले आहेत. त्यांना देखील प्रत्येकी पाच-पाच हजार रुपयांचा दंड लावून तात्काळ वसूलही करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पथकात करण गायकवाड, विनय ठाकूर यांच्यासह शेख रफिक, शेख इस्माईल, कदम आणि इतर दहा कर्मचारी सहभागी होते.

ABOUT THE AUTHOR

...view details