परभणी - अल्पवयीन मुलीची वाटेत छेड काढणे एका रोडरोमिओला चांगलेच महागात पडले. या प्रकरणी परभणी न्यायालयाने मुख्य आरोपी बाळू भुमरेला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
मुलीची छेड काढणे पडले महाग, आरोपीला २ वर्ष सश्रम कारावास हेही वाचा - '...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'
ही घटना परभणी तालुक्यातील पिंगळी येथील असून याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पीडिता लहान बहिणीला शाळेतून आणण्यासाठी जात होती. यादरम्यान गावातील बाळू उर्फ तुकाराम विठ्ठलराव भुमरे (वय २१ वर्ष) याने मुलीचा पाठलाग करून वाईट हेतुने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर ताडकळस पोलीस ठाण्यात (गुरनं १७८ / १६ कमल ३५४ अ, २९४, ३२३, ३४ भादंवि आणि कलम ०८ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ प्रमाणे) बाळू भुमरेसह त्याचा साथीदार मुंजा उर्फ संजय राजाराम पिसाळ (वय २४ वर्ष) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - हिंगणघाट जळीत प्रकरण : पीडितेने रुग्णालयात नेताना व्यक्त केली होती 'ही' भावना
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक डी. एस. इंगळे आणि शेख वसीम शेख हारून यांनी करून आरोपी विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार परभणी सत्र न्यायालय हा खटला सुरू होता. या प्रकरणी सोमवारी बाळू भुमरेला दोन वर्ष सक्षम कारावासासह २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तर, त्याचा साथीदार मुंजा पिसाळ याला एक महिन्याच्या शिक्षेसह पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील दराडे यांनी पाहिले. तर कोर्ट पैरवीचे काम पोलीस कर्मचारी मारोती कुंडगीर यांनी केले.