परभणी -लाडक्या चिरंजीवाचा लॉकडाऊनमध्ये शाही विवाह स्वागत सोहळा आयोजित करून शेकडो लोकांना कोरोनाच्या विळख्यात अडकवणाऱ्या गंगाखेडच्या उद्योजकाकडून प्रशासनाने अडीच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पाच लाख रुपये दंड वसूल करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले होते. त्यापैकी अडीच लाख वसूल झाले. मात्र, या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या राजकीय पुढारी, बड्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांची देखील चौकशी सुरू असून त्यांंच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गंगाखेड येथील विवाह सोहळ्यानिमित्त बेकायदेशीररित्या स्वागत समारंभ आयोजित करीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरल्याबद्दल आयोजक व्यापारी राधेश्याम भंडारी यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना दिले होते. त्या आदेशानुसार भंडारी यांना 7 दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावली. मात्र, 7 दिवसाच्या मुदतीनंतरही काहीच कार्यवाही न झाल्याने माध्यमातून ही बाब पुन्हा चर्चेत आली. त्यानंतर प्रशासनाकडून त्या स्वागत समारंभाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यानंतर व्यापारी भंडारी यांच्याकडून पहिल्या टप्प्यात अडीच लाखांंचा धनादेश तहसीलदारांकडे पोहचला.
दरम्यान, भंडारी कुटुंबाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या स्वागत समारंभासाठी संबंधित कुटुंबाने परवानगी घेतली होती का? तसेच या स्वागत समारंभासाठी नेमके किती लोक उपस्थित होते? याबाबत तात्काळ अहवाल सादर करण्यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा या तिघांचा समावेश असलेली ही समिती जिल्हाधिकाऱ्यांना लवकर अहवाल सादर करणार आहे.
विशेष म्हणजे सुरुवातीला राधेश्याम भंडारी यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभानंतर केवळ एक कागदी नोटीस गंगाखेडच्या तहसीलदारांनी बजावली होती. मात्र या स्वागत सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली. त्याचा फैलाव झपाट्याने होत आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने जवळपास दीडशे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, असे असतानाही या सोहळ्याच्या आयोजकांवर तसेच हा सोहळा रोखण्याऐवजी त्याला जाऊन उपस्थित राहणाऱ्या पुढारी आणि अधिकारी यांच्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यांची कोणतीही चौकशी झाली नाही, ही बाब प्रकर्षाने बातम्यांमधून आल्या नंतर त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारी यांच्या स्वागत समारंभाच्या चौकशीच्या निमित्ताने ही समिती गठीत केल्याने आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही समिती नेमका काय अहवाल देते? यामध्ये कोणते कोणते पुढारी आणि अधिकारी दोषी आढळतात? याकडे प्रामुख्याने आता सर्वांचे लक्ष लागले आहे.