परभणी - जुलै महिन्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लॉकडाऊनमध्ये देखील वाढ होताना दिसून येते. याच पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील सर्व नागरी भागात 2 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात आज (शुक्रवारी) संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे.
परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या सुरूवातीचा दीड महिन्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यानंतर जून महिन्याच्या शेवटपर्यंत मात्र, 100 रुग्णांची भरती झाली होती. तोपर्यंत देखील परभणी जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत होते. मात्र पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि रेड झोनमधील जिल्ह्यांमधून नागरिकांचे लोंढे येण्यास सुरू झाले आणि जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा एकदम चारपट होऊन बसला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. सध्या परिस्थिती 460 हून अधिक कोरोनाबाधित रूग्ण जिल्ह्यात झाले असून, त्यापैकी सव्वादोनशेहून अधिक रुग्णांवर कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत. दररोज 50 हून अधिक संभाव्य रुग्णांची देखील तपासणी केली जात आहेत.