परभणी - कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने वारंवार लॉकडाऊन, संचारबंदी लागू केले. मात्र तरीसुध्दा सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करत परभणी पोलिसांनी 7 हजारांहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करत त्यांच्याकडून 18 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.
परभणी जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटपर्यंत केवळ 100 रुग्ण आढळले होते. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत जाऊन सध्या 481 रुग्ण संख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 9 दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. शिवाय प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी देखील संचारबंदी सुरू केली आहे. असे असले तरी रस्त्यावर विनाकारण फिरणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे व लॉकडाऊनचे इतर नियम तोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
जिल्हा पोलीस दलाने 10 जुलैपासून मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्या आहेत. या अंतर्गत मास्क न लावणाऱ्या एकूण 3 हजार 718 व्यक्तींविरूध्द पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करीत 9 लाख 23 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दुचाकी वाहनांवर आणि डबलसीट प्रवास करणाऱ्या 3 हजार 72 दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच 3 व्यक्तींसह वाहन चालविणाऱ्या 286 वाहनांवर तर चारचाकी वाहनात सोशल डिस्टन्सिंग न पाळता प्रवास करणाऱ्या 289 वाहनचालकांविरूध्द मोटारवाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून 8 लाख 32 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच गेल्या चार महिन्यांत या प्रकरणात 138 खटल्यामध्ये दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात सादर करण्यात आले. त्यापैकी 35 व्यक्तींना न्यायालयाने प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला. तसेच दंड न भरल्यास 7 दिवसांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
"10 पोलीस कोरोनाबाधित; 141 क्वारंटाईन"
दरम्यान, परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्यापासून नाकाबंदी, सीमाबंदी ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या एका अधिकासह नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातून ते कोरोनामुक्त होवून कर्तव्यावर सुध्दा हजर झाले आहेत. त्यांच्या संपर्कातील किंवा अन्य संबंधीत 13 पोलीस अधिकारी, 127 कर्मचारी असे एकूण 141 पोलिसांना कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवनात क्वारंटाईन करण्यात आले होते, अशी माहित जिल्हा पोलीस दलाच्यावतीने देण्यात आली आहे.