परभणी -शहरासह जिल्ह्यात आज (सोमवारी) सायंकाळपर्यंत तब्बल 147 कोरोनाबाधीत आढळले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 25 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात वाढणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता विदर्भासोबतच मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या खाजगी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद आणि नांदेड येथे येणाऱ्या-जाणाऱ्या महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीवर देेेखील 23 मार्चपर्यंत निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सायंकाळी बजावले आहेत.
तब्बल 147 व्यक्ती कोरोंनाबाधीत; दोघांचा मृत्यू -
परभणी शहरासह जिल्ह्यात आज (सोमवारी) सायंकाळपर्यंत तब्बल 147 व्यक्ती कोरोनाबाधीत आढळल्या तर दोघा कोरोनाबाधित पुरूष रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनामुक्त 25 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात 451 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 345 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 9 हजार 420 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 8 हजार 624 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 42 हजार 713 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 32 हजार 713 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 9 हजार 267 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 594 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
पुणे, मुंबईची खासगी तर नांदेड, औरंगाबादची एसटी वाहतूक बंद -
परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढत आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासनाच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व जिल्ह्यांच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, आता मुंबई, पुणे औरंगाबाद, नांदेड इत्यादी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांकडून संपर्कात आलेल्या व्यक्तीमार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग जिल्ह्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या जिल्ह्यांतील प्रवासी वाहतुकीद्वारे परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती परभणी जिल्ह्यातून पुणे व मुंबईकडे जाणारी व येणारी सर्व खासगी बस वाहतूक 16 ते 23 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे परभणी जिल्ह्यातून औरंगाबाद व नांदेड येथे जाणारी व येणारी प्रवासी वाहतूक देखील 16 ते 23 मार्चपर्यंत बंद केली आहे. या प्रतिबंधातून अत्यावश्यक सेवेस मात्र सूट देण्यात आली आहे.