परभणी- जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांना अॅन्टीजेन टेस्टचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 25 जुलै) शहरातील औषधी आणि किराणा व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 264 व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापाकी 13 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. तर हे व्यापारी राहत असलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
गंगाखेडमधील 264 पैकी 13 व्यापाऱ्यांना कोरोना, तपासणीनंतरच दुकाने उघडणे बंधनकारक - parbhani corona update
परभणीतील हॉटस्पॉट ठरलेल्या गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. आज 264 व्यापाऱ्यांनी केलेल्या चाचण्यांपैकी 13 व्यापाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गंगाखेड येथील एका मोठ्या जिनिंग उद्योजकाने आपल्या चिरंजीवाचा शाही विवाह स्वागत सोहळा 25 जूनला आयोजित केला होता. या सोहळ्याला राजकीय पुढारी, अधिकारी-कर्मचारी आणि शेकडो व्यापारी उपस्थित झाले होते. पण, या सोहळ्यात आयोजकांच्या घरातच कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने याचा प्रसार अन्य गंगाखेडवासीयांपर्यंत पोहोचला. परिणामी पाहता-पाहता गंगाखेड शहरात आणि तालुक्यात दीडशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. यामुळे जिल्हाधिकार्यांनी याठिकाणच्या प्रत्येक व्यापाऱ्याला तपासणी करूनच आपला व्यवसाय करावा, असे बंधन घातले आहे. तर ग्रामीण भागासह शहरात सर्वेक्षण करण्यात येत असून प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रशासन तयारी करत आहे.
दरम्यान, कोरोना गंगाखेडच्या गल्लीबोळांमध्ये पसरला असल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांत भितीचे वातावरण आहे. मात्र, अॅन्टीजन टेस्टींग कीट संपल्यामुळे गंगाखेडला होणाऱ्या कोरोना चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. यावरून भितीत अधिकच भर पडली होती. मात्र, आता रॅपीड ॲंटीजेन टेस्ट कीट उपलब्ध झाल्या असून, या मार्फत चाचण्या केल्या जात आहेत. तसेच कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच गंगाखेडच्या व्यापाऱ्यांना आपली दुकाने उघडता येणार आहेत. त्यामुळे शहरात शनिवारी सकाळपासून व्यापाऱ्यांच्या कोद्री रस्त्यावरील अल्पसंख्याक मुलींच्या हाॅस्टेलवरील कोविड केअर सेंटरमध्ये अॅन्टीजेन टेस्ट होत आहेत. या ठिकाणी सायंकाळपर्यंत 264 व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 13 व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून, या सर्वांना आता कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, रविवारी (दि. 26 जुलै) भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी कीट अभावी बंद पडलेल्या रॅपिड कोरोना चाचण्या सुरू केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी गंगाखेडसाठी आणखी कीट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.