परभणी - मानवत शहरात मागील आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, खेळाची मैदाने आदी गर्दीची ठिकाणे दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा (मिनी लॉकडाऊन) करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी गोयल यांनी आज बुधवारी मानवतच्या नगरपालिकेत बैठक घेऊन निर्बंध याबाबतच्या कडक सूचना दिल्या आहेत.
मानवत शहरात मागील आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली होती. जिल्ह्यात हा कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवारी मिनी लॉकडाऊनचे आदेश काढले आहेत. मानवत शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आणि खेळाची मैदाने आदी ठिकाणे १६ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हेही वाचा-अखेर योगी सरकार झुकलं; राहुल गांधी सीतापूरमध्ये दाखल, प्रियंकांसह लखीमपूर खेरीकडे होणार रवाना
जबाबदारीने मास्कचा वापर करा - गोयल
मानवत येथील लसीकरणाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी नगरपरिषदेच्या नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. मानवत शहर येत्या दहा दिवसात 100 टक्के कोरोना लसीकरण पुर्ण होण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती द्यावी. मानवत शहरातील नागरिकांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जबाबदारीने मास्कचा वापर करावा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून दूर ठेवण्यासाठीआरोग्य विभागाने कोरोना चाचण्या व लसीकरण वाढविण्यावर भर द्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केल्या आहेत.
हेही वाचा-कर्नाटक: मुसळधार पावसाने घर कोसळले; बेळगाव जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू