पालघर- जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत. जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी मैदानात उतरणार की हे तीनही पक्ष स्वबळावर लढणार याबाबत तिघांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ चालू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवसच शिल्लक असताना उभयतांमध्ये अजून चर्चासत्रेचं सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
या जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीला काही विषय समित्या देऊन सुरुवातीच्या काळात भाजप-शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने एकञ येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत हे तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे पक्ष पुन्हा एकञ आले. मात्र, बहुजन विकास आघाडीने कम्युनिस्ट पक्षासारखा नवा भिडू घेऊन दोन्ही काँग्रेससोबत महाआघाडी केली. या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव करीत युतीचे राजेंद्र गावित निवडून आले. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीत युती विरूद्ध महाआघाडीचा सामना रंगला. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार विधानसभा मतदारसंघ, बोईसर, नालासोपारा, विक्रमगड, पालघर आणि डहाणू या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एकही जागा भाजपला जिंकता आली नाही. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या तीन जागा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष प्रत्येकी एक जागा निवडून आल्या.