पालघरYouth Murder on Ind vs Aus Match: विश्वचषकाच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना बघताना झालेला वाद एका तरुणाच्या जिवावर बेतला आहे. प्रवीण राठोड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सामना बघताना दोघांनी केलेल्या बेदम मारहाणीत प्रवीणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपी फरार झाले आहेत.
सामना पाहताना सलूनमध्ये झाला वाद : विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना सुरू असताना बोईसरमधील चित्रालय परिसरातील एका केशकर्तनालयात प्रवीण राठोड आणि आरोपी मनोज गिरी आणि प्रतीक बसलेले होते. तिथं प्रवीण राठोड हा मोबाइलवर क्रिकेट सामना बघत होता. यावेळी आरोपींनी " तुम्हारा इंडीया हारेगा " असं म्हणून वाद घातला. सामन्यात कोण जिंकेल यावरुन झालेला वाद हाणामारीपर्यंत गेला. यानंतर आरोपींनी त्यांच्या इतर मित्रांना बोलावून प्रविण राठोड याला मारहाण केली. यावेळी केशकर्तनालयातील खुर्चीचा एक भाग काढून गिरी यानं प्रवीणच्या डोक्यावर जबर मारहाण केली. त्यात गंभीर दुखापत झाल्यानं प्रवीणला प्रथम बोईसरच्या तारापूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्यानं त्याला मीरा रोड येथील तुंगा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान 23 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.