महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: वारली कलाकुसर केलेल्या छत्र्यांच्या माध्यमातून तरुणांना मिळतोय रोजगार

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वारली चित्रकला व हस्तकलेच्या वस्तूंना सातासमुद्रापार देखील मोठी मागणी आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाऊन व इतर निर्बंधांमुळे या कारागिरांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यावर उपाय म्हणून या वारली चित्रकला करणाऱ्या ४५० तरुणांनी आदिवासी युवा सेवा संघाच्या माध्यमातून एकत्र येत पावसाळ्यात लागणाऱ्या छत्र्यांवर वारली चित्र काढण्यास सुरुवात केली.

Umbrellas with Warli Painting
वारली चित्रकला केलेल्या छत्र्या

By

Published : Jul 19, 2020, 1:09 PM IST

पालघर - कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे अनेक व्यवसायांना खीळ बसली आहे. पालघरमधील आदिवासी भागात वारली चित्रकला करणारे चित्रकारही याला अपवाद ठरले नाहीत. मात्र, या सगळ्या संकटातून मार्ग काढत आदिवासी युवा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक वारली कलाकारांना रोजगार देण्याचे काम सध्या सुरू आहे.

वारली कलाकुसर केलेल्या छत्र्यांच्या माध्यमातून तरुणांना मिळतोय रोजगार

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वारली चित्रकला व हस्तकलेच्या वस्तूंना सातासमुद्रापार देखील मोठी मागणी आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाऊन व इतर निर्बंधांमुळे या कारागिरांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यावर उपाय म्हणून या वारली चित्रकला करणाऱ्या ४५० तरुणांनी आदिवासी युवा सेवा संघाच्या माध्यमातून एकत्र येत पावसाळ्यात लागणाऱ्या छत्र्यांवर वारली चित्र काढण्यास सुरुवात केली. बाजारपेठेतून साध्या छत्र्या विकत घेऊन हे तरुण छत्रीवर वारली चित्र काढून त्यांची विक्री करतात. वारली चित्रकला असलेल्या या छत्र्यांची किंमत २०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. यातूनच हे कलाकार आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

आदिवासी चित्रकला, हस्तकला आदींना मोठी मागणी असली तरी त्याकडे शासनाचे विशेष लक्ष नाही. त्यामुळे ही हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी आदिवासी युवा सेवा संघाने पुढाकार घेतला असून या उपक्रमामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. शाळेतील विद्यार्थी आणि तरुण कलाकार या उपक्रमात सहभागी झाले आहेत. एक छत्री तयार करण्यासाठी त्यांना ८० ते २५० रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते. यातून या आदिवासी कलाकारांना रोजगार तर मिळतोच शिवाय आदिवासी वारली चित्रकला जिवंत राहण्यास मदतही होत आहे. देशातील आणि राज्यातील नागरिकांनी या छत्र्या खरेदी केल्या तर यातून गरजूंना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा या चित्रकारांनी व्यक्त केली आहे.

परदेशात आदिवासी हस्तकलेला मोठी मागणी असली तरी सध्या आयात- निर्यात बंद असल्याने या आदिवासी चित्रकला करणाऱ्या कारागिरांना रोजगाराची गंभीर समस्या भेडसावत होती. मात्र, यावर आदिवासी युवा सेवा संघाने शोधलेला हा पर्याय नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details