पालघर/नायगाव - नायगाव पूर्वेतील परेरा नगरमधील प्रेरणा कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचा पालिकेच्या कचरागाडी (कॉम्पॅक्टर) खाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास ही घटना घडली.
नायगाव येथे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीखाली येऊन महिलेचा मृत्यू - पालघर पोलीस बातमी
नायगाव येथे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीखाली येऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या अहवालाची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नायगाव पूर्वेतील भागात परेरा नगर परिसर आहे. याच भागात प्रेरणा कॉलनी परिसर आहे. याच भागातून पालिकेची कचरागाडी कचरा गोळा करण्यासाठी आली होती. याच दरम्यान भाजी घेण्यासाठी निघालेल्या व्हॉयलेट फर्नांडिस (५०) याचा रस्त्याच्या कडेने जाताना पाय घसरून त्या थेट गाडीच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
त्यांचे पती हे परदेशात असून त्यांना १२ वर्षाचा एक मुलगा आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला वाहनासह ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची पाहणी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यात पोलिसांच्या अहवालाची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.