पालघर -मनोर येथे राहणाऱ्या एका महिलेने केळवा सागरी पोलीस ठाण्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. केळवा सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रेमसंबंधातून तिची फसवणूक केल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समजते.
मनोर येथे राहणारी ही महिला विवाहित असून सदर पोलीस कर्मचारी मनोर येथे लॉकडाऊनदरम्यान गस्तीसाठी असताना त्याची तिच्याशी ओळख झाली. यादरम्यान दोघांचेही प्रेम संबंध जुळल्याचे समजते. यानंतर या महिलेने आपल्या पतीला घटस्फोट देण्याचे धाडस केले. ती घटस्फोट घेतल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यासोबत केळवे येथे राहत होती अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी दिली.
पोलीस ठाण्यात महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
एका पोलिसाने फसवणूक केल्यामुळे मनोर येथे राहणाऱ्या एका महिलेने केळवा सागरी पोलीस ठाण्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसांपासून सदर पोलीस कर्मचारी घरी आला नसल्याने आपली फसवणूक झाली. या भीतीने ही महिला मंगळवारी दुपारच्या सुमारास केळवे पोलीस ठाण्यात यासंबंधीची दाद मागण्यासाठी आली होती. मात्र सदर पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात हजर नसल्याने, तिने स्वतः जवळ असलेले औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तिला चक्कर आल्याने ती पोलीस ठाण्यात कोसळली.
तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास या तक्रारीची नोंद घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करू, असेही उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सांगितले.