पालघर- मुरबे येथील मच्छीमार समुद्रात मासेमारी करण्यास गेले असता त्यांनी मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात एक विशाल व्हेल मासा अडकला. जाळ्यात अडकलेल्या या व्हेल माशाची सुखरूपपणे सुटका करण्यात आली.
मच्छीमारांनी जाळे कापून केली व्हेल माशाची सुखरूप सुटका; पालघर येथील घटना - पालघर मच्छीमार बातमी
पालघर येथील मच्छीमारांनी मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात एक विशाल व्हेल मासा अडकला असता त्याची सुखरूपपणे सुटका करण्यात आली.
पालघर तालुक्यातील मुरबे येथील मिलन तरे यांच्या मालकीची जय वंदन साई ही बोट मच्छीमारीसाठी समुद्रात गेली होती. आपल्या बोटीतील जाळे मासे पकडण्यासाठी समुद्रात टाकले असताना त्यांना जाळ्यात काहीतरी मासा अडकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नीट पाहिले असता सुमारे 15 ते 20 फुटांचा व्हेल मासा जाळ्यात अडकून सुटकेसाठी धडपडत असल्याचे पहावयास मिळाले. बोटीतील सर्व मच्छिमारांनी एकत्र येत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. माश्याच्या शरीराभोवती लपेटलेले जाळे कापून माशाला कुठलीही इजा न करता सुखरूपपणे काढण्यात आले. जाळ्यातून सुटका झाल्यानंतर हा व्हेल मासा पाण्यात दिसेनासा झाला.