पालघर - गतवर्षी पिंजाळ नदीला आलेल्या पुरात पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड तालुका यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग वाहून गेला. या वाहून गेलेल्या भागाच्या पुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण झाले नाही, त्यामुळे या मार्गाला नदीपात्रातून पर्यायी रस्ता काढण्यात आला. उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला तरीदेखील या पुलाचे बांधकाम झाले नाही. पालघर जिल्ह्यात पाऊस झाल्याने पर्यायी केलेल्या रस्त्यावर पाणी जमा झाले. पाण्य़ाचा अंदाज न आल्याने येथे एक ट्रक अडकला होता.
पालघरमधील वाडा-मलवाडा पुलाचे काम रखडले, पर्यायी रस्त्यावर ट्रक फसला - वाडा-मलवाडा पूल न्यूज
गेल्यावर्षी पिंजाळा नदीला आलेल्या पुरात पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड तालुका यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग वाहून गेला. या वाहून गेलेल्या भागाचे अद्यापही बांधकाम पूर्ण झाले नाही. वाहतूक करण्यासाठी पर्यायी रस्ता केला आहे, मात्र, त्या रस्त्यावरही पाणी साचले आहे. त्यामुळे या पुलाचे काम लवकर करावे, अशी मागणी होत आहे.
पर्यायी व्यवस्था केलेल्या कच्च्या रस्त्याने मलवाडा ते वाडा येथून जात असलेला ट्रक हा नदी पात्रातील रस्त्यावर जमा झालेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो फसला. या ट्रकला काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. अथक प्रयत्नानंतर हा फसलेला ट्रक काढण्यात आला. हा पूल दोन तालुक्यांना जोडणारा आहे. या पुलाचे जर काम लवकर पूर्ण झाले नाहीतर पुन्हा मोठ्या पावसात पूल वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागाची रस्ते वाहतूक पूर्ण अडचणीत येईल, अशी भीती व्यक्त होतेय.
यासंदर्भात विक्रमगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एच. पवार यांच्याशी संपर्क साधला असता सदर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ते पूर्ण होईल. या पुलाचे 67.50 मिटरचे काम होत असून, या कामासाठी 3 कोटी 33 लाख रुपये खर्च होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.