विरार (पालघर)- कोरोनामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार परसरला असताना पोलीस विभाग मात्र आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. या खाकी वर्दीतली माणूसकी आपण सगळ्यांनी पाहिली आहे. असाच एका मनाला घर करणारा प्रकार पालघच्या विरारमध्ये समोर आला आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाकीतील माणुसकी पहायला मिळाली.
विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील प्रमोद खारे (वय 45 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल. मात्र, कोणीही नातेवाईक लॉकडाऊनमुळे येऊ न शकल्याने पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी पुढाकार घेत मृतदेहावर अंतिम संस्कार केला. यावेळी त्यांनी नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून दर्शन घडवले. फुलपाडा येथे प्रमोद खारे हे घरी एकटेच राहतात. अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे नातेवाईक कोलकाता आणि दिल्लीवरून अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नव्हते. मात्र, पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी मृत प्रमोद खरे यांचा बंद झालेला मोबाईल चार्ज करून नातेवाईकांशी संपर्क साधला.