पालघर/विरार - टाळेबंदीनंतर विरार परिसरात छोट्या मोठ्या घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. यावर प्रतिबंध मिळवण्यासाठी विरार पोलीस तथा गुन्हे प्रगटीकरण शाखा यांनी साचेबद्ध तपास करत २८ घरफोड्यांची उकल केली असून तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यातील ६ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहायक पोलीस उपायुक्त विरार रेणुका बागडे यांनी माहिती दिली की, टाळेबंदीच्या दरम्यान आणि टाळेबंदीनंतर विरारमध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. या चोऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी आणि गुन्हे प्रगटीकरण शाखेने अनेक घरफोड्यांची तपासणी केली असता त्यातील अनेक घरफोड्या ह्या एकाच पद्धतीने झाल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत विरार पूर्व कातकरी पाडा परिसरातून शंकर हल्या दिवा (३०), रफिक शेख (२२), चंद्रकात साटम (२१) यांना ताब्यात घेतले.