पालघर -जंगलातील विविध रानभाज्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि फायदेही विद्यार्थी तसेच नागरिकांना व्हावेत. या हेतूने जीवन विकास शिक्षण संस्था, पालघर आणि सुंदरम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे रानभाजी परिचय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी पालघरमधील विद्यार्थी तसेच नागरिकांनी गर्दी केली होती.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात मानवी शरीरासाठी पोषक असणाऱ्या रानभाज्या मिळतात. फास्टफूडच्या आहारी गेलेल्या तरुणांना रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि पौष्टिकता, याची व्हावी, तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही रानभाज्यांची माहिती आणि महत्त्व पटवून देण्यासाठी पालघरमधील जीवन विकास शिक्षण संस्था आणि सुंदरम एज्युकेशन फाउंडेशन यांच्यामार्फत रानभाजी परिचय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पालघरमध्ये जीवन विकास शिक्षण संस्था, सुंदरम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे रानभाजी परिचय महोत्सवाचे आयोजन या परिचय महोत्सवात डोंगराळ भागात मिळणाऱ्या रान कारली, शेवळी, देठ, अळिंबसह 100 अधिक रानभाज्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. जंगलात मिळणार्या रानभाज्या शरीरास अत्यंत पोषक असून बिनविषारी आहेत. बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्यांपेक्षा रानभाज्या अधिक रुचकर, औषधी आणि शरीरास उपयुक्त असल्याने या रानभाज्यांची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
रानभाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून ओळखता येत नसल्याने रानभाज्या विक्रीसाठी येत नाहीत. रानभाज्यांची ओळख नागरिकांना पटवून दिल्यास डोंगराळ भागात राहणाऱ्या बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळेल, असे मत महोत्सवाचे मार्गदर्शक जगन्नाथ हिलीम यांनी व्यक्त केले.
यावेळी जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष वागेश कदम, प्रणव कदम, बी.एन जयस्वाल आणि नरेंद्र गाला, आदी उपस्थित होते.