महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्याच पावसात वसई-विरार महानगरपालिकेच्या दाव्याची पोलखोल; अनेक भागात साचले पाणी - वसई-विरार पावसाळी उपाययोजना

कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी दुपारी वसई विरारमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही तासाच्या पावसाने नालासोपारा, तुळिंज, विवा कॉलेज परिसरात पाणी साचले. त्यामुळे वसई-विरार शहरासमोरील पावसाळ्यातील संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Vasai-Virar
वसई-विरार

By

Published : Jul 4, 2020, 2:49 PM IST

पालघर: वसई-विरार शहर पुढील वर्षी पाण्याखाली जाणार नाही, असा दावा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर आणि वसई-विरार महानगरपालिकेने गेल्या वर्षी केला. मात्र, पहिल्याच पावसात हा दावा बुडाला आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसात नालासोपारा, तुळिंज, विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. यामुळे वसई-विरार शहरासमोरील पावसाळ्यातील संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.

कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी दुपारी वसई विरारमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही तासाच्या पावसाने नालासोपारा, तुळिंज, विवा कॉलेज परिसरात पाणी साचले. मागील दोन वर्षीही शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही याच परिसरात प्रचंड पाणी भरले होते. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही ठिकाणी तर लहान बोटींद्वारे मदत पुरवावी लागली होती. या पूरस्थितीमुळे मनपा आणि बहुजन विकास आघाडीवर नागरिकांनी टीकेची झोड उठवली.

पहिल्याच पावसात बुडाला वसई-विरार महानगरपालिकेचा दावा

या पार्श्वभूमीवर ठाकूर व मनपाचे तत्कालिन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पुढील वर्षी वसई-विरार शहर पाण्याखाली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. सोबतच मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही दिली होती. यात नॅशनल एनव्हार्यनमेंट इजिनिअरींग रिसर्च संस्था (निरी) आणि आयआयटीकडून सुचवण्यात येणाऱया उपाययोजनांचा समावेश होता. प्रत्यक्षात मात्र निरी आणि आयआयटी यांच्यावर 12 कोटी रुपये खर्च करूनही या संस्थांनी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी पालिकेने केलेली नाही. त्यामुळे यावर्षी शहर पुन्हा पाण्याखाली जाणार, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी झालेल्या पावसाने याची प्रचीतीही आली असून ठाकूर आणि पालिकेचा दावा खोटा ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details