विरार ( पालघर ) -अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या गुरचरण जागेवर बेकायदा झालेल्या अतिक्रमणांविरोधात वसई तहसील विभागाने ( Vasai Administration anti encroachment drive ) कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आली आहे . या धडक कारवाईत तब्बल ५० झोपडया आणि २४ ढाबे जमीनदोस्त ( 50 huts hotels destroyed at beach ) करण्यात आले. यावेळी संतप्त अतिक्रमणधारक महिला व पोलिसांत झटापटही झाली.
विरार-अर्नाळा समुद्रकिनारी असलेली सर्वे क्रमांक ४५/अ/१ या जागेची वसई तहसील दफ्तरी 'गुरचरण जागा' अशी नोंद आहे. मागील काही वर्षांत या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असल्याने या ठिकाणी झोपडया आणि ढाबे, टपरी उभारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे ही जागा तहसील विभागाने मच्छीमारांकरता मासळी सुकवणे, जाळी विणणे, बोटी शाकारणे या कामी राखून ठेवली होती. त्यानंतरही या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने तहसील विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. आगाशी मंडळ अधिकाऱ्यांच्यावतीने अतिक्रमण धारकांना ३१ नोव्हेबर २०२१ रोजी नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. या नोटीसीत अतिक्रमणधारकांना स्वतःहून ही अतिक्रमणे हटवावीत, असे सूचित करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने तहसील विभागाने या अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई केली.
हेही वाचा-Congress leaders to meet CM : काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; निधी वाटप वादावर चर्चा?
आम्हाला व्यवसायाकरता मुभा द्या - ढाबा चालकाची मागणी-
ढाबा चालक संतोष भोईर म्हणाले, की मी अर्नाळा ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे. मागील ३० वर्षे या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करत आहे. आम्हाला धडक कारवाईकरता तहसील विभाग, मेरीटाइम बोर्ड आणि वनविभाग अशा तिघांच्याही नोटीस येत आहेत. आम्ही या तिघांनाही उत्तरे दिलेली आहेत. ही जागा नेमकी कुणाची हे निश्चित करून आम्हाला व्यवसायाकरता मुभा द्या, अशी विनंती केली होती. मात्र, यावर कोणताही विचारविनिमय न करता तहसील विभागाने अशी कारवाई केली आहे. एकीकडे पर्यटनाला उत्तेजन द्या म्हणायचे आणि दुसरीकडे सेवा देणाऱ्या नागरिकांच्या दुकानांवर कारवाई करायची? हा कुठला न्याय? असा सवाल ढाबा चालक भोईर यांनी केला आहे.