महाराष्ट्र

maharashtra

#कोरोना : चार संशयितांच्या चाचण्या निगेटिव्ह; पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपायायोजना

By

Published : Mar 16, 2020, 2:25 PM IST

पालघर जिल्ह्यातील ४ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Palghar District Collector Dr. Kailas Shinde
पालघर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे

पालघर - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण बाधित आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. पालघर जिल्ह्यातील ४ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...COVID-19 LIVE : मुंबई अन् यवतमाळमध्ये आढळले नवे रुग्ण, राज्यातील एकूण संख्या ३८ वर

पालघर जिल्ह्यात परदेशातून आलेले परदेशी नागरिक, भारतीय नागरिक व त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचा तपास जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. आत्तापर्यंत अशा ७० नागरिकांचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी १९ नागरीकांचा १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी संपलेला आहे. यापैकी लक्षणे आढळलेल्या ९ पैकी ४ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून संशयित ५ रुग्णांचे अहवाल येणे अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा...कोरोना इफेक्ट : १९ ते ३१ मार्चपर्यंत आगामी चित्रपटाचे शूटिंग रद्द

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रअंतर्गत आणि बोईसर क्षेत्रातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, शैक्षणिक संस्था तसेच चित्रपटगृह, नाट्यगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच यात्रा, जत्रा, दिंडी, पदयात्रा, कीर्तन, भंडारा, सार्वजनिक सप्ताहात नागरिकांची गर्दी जमेल, असे कार्यक्रम साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येणार नाही. अशा कार्यक्रमांना यापूर्वी परवानगी दिली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होणारे कौटुंबिक खासगी कार्यक्रम, लग्न समारंभ जिल्ह्यात होणार असतील, ते जनतेने आपली सामाजिक जबाबदारी समजून पुढे ढकलावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details