नालासोपारा(पालघर) - वसई विरार महापालिकेने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन काळात ठिकठिकाणी हात निर्जंतुक करण्यासाठी हँडवॉश स्टेशन उभारण्यात आले होती. मात्र, आता या केंद्रांचा वापरच केला जात नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे तब्बल 59 लाख 50 हजार रुपये वाया गेले आहेत. या केंद्रातील नळ चोरीला गेले असून गर्दुल्यांनी या हँड वॉश स्टेशनला आपला अड्डा बनवला आहे, तर काही ठिकाणी भाजीवाल्यांनीही यावर कब्जा केला आहे.
हँडवॉश स्टेशन बंदच..! वसई-विरार महानगरपालिकेचे 59 लाख रुपये पाण्यात
महानगरपालिकेने शहरातील एकूण 17 ठिकाणी हँडवॉश स्टेशन उभारली होती. नागरिक त्याचा वापर करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर कुणाची देखरेख नसल्याने या हॅण्डवॉश केंद्रातील नळ चोरीला गेले आहेत. काही ठिकाणी तर गर्दुल्यांनी आपला अड्डा बनविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तेथे फिरकत देखील नाही. अविचाराने आणि घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाने पालिकेचा पैसा पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. हा विषाणू हातावाटे नाकातोंडात जातो. त्यामुळे हात वारंवार धुणे, निर्जंतुकीकऱण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सतत सॅनिटायझरने हात धुण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला. त्यानंतर प्रत्येक घरात सॅनिटायझरचा वापर सुरू झाला. इमारतीत आणि कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेने शहरातील सर्व इमारतींना प्रवेशद्वारावर हात धुण्याचे सॅनिटायझर (हॅण्ड वॉश बेसिन) बसविणे अनिवार्य केले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कुठेही हात धुता यावे, निर्जंतुकीकऱण करता यावे यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून हॅण्डवॉश सेंटर तयार करण्यात आले. मात्र, नागरिकांची उदासिनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत.
महानगरपालिकेने शहरातील एकूण 17 ठिकाणी हँडवॉश स्टेशन उभारली होती. नागरिक त्याचा वापर करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर कुणाची देखरेख नसल्याने या हॅण्डवॉश केंद्रातील नळ चोरीला गेले आहेत. काही ठिकाणी तर गर्दुल्यांनी आपला अड्डा बनविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तेथे फिरकत देखील नाही. अविचाराने आणि घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाने पालिकेचा पैसा पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.
एका हॅण्डवॉश सेंटरसाठी साडेतीन लाख रुपयांचा खर्च पालिकेने केला आहे. पालिकेने शहरात एकूण 17 हॅण्डवॉश सेंटर उभारले होत. त्यामुळे पालिकेचा 59 लाख 50 हजार रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. एवढा खर्च का? असा सवाल पालिका अधिकाऱ्यांना विचारला असता, सध्या या हॅण्डवॉश सेंटरचा उपयोग हात धुण्यासाठी होईल नंतर पाणपोई म्हणून केला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
शहरातील वसई येथील पापडी, पारनाका, रेंज ऑफिस, गावराई नाका, गोलानी नाका, अंबाडी रोड, सातिवली तर नालासोपाऱ्यात 5 ठिकाणी आणि विरार येथे 2 ठिकाणी असे एकूण 17 ठिकाणी उभारलेली हॅण्डवॉश सेंटर महानगरपालिकेने उभारले आहे.
पैसे वाया गेले नाहीत -
शहरात 17 ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारली आहेत. नागरिकांनी करोनाला दूर ठेवण्यासाठी या केंद्रातून हात धुवावेत. नंतर आम्ही या हॅण्डवॉश सेंटरचा उपयोग कायमस्वरूपी पाणपोईसाठी करणार आहोत. त्यामुळे पैसे वाया गेले असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया वसई विरार महानगरपालिकेच्रे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.