वसई (पालघर)कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, हातमोजे, पीपीईकीट यासारख्या साहित्याांचा वापर केला जातो. परंतु या साहित्याचा वापर झाल्यानंतर, काही नागरिक हे साहित्य सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आता नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. सार्वजिक ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांकडून मास्क, हातमोजे आणि इतर सुरक्षा साधनाचा वापर केला जातो. वापर केलेल्या या वस्तू सुरक्षीत ठिकाणी कचराकुंडीतच टाकणे अपेक्षित आहे. मात्र नागरिक या वस्तू भर रस्त्यात टाकत असल्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक ठिकाणी आढळले मास्क आणि पीपीईकीट
वसई पूर्वेतील मधूबन परिसरात रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी पीपीईकीट व मास्क टाकल्याचे आढळून आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच जे लोक कचरा आणि भंगार वेचण्याचे काम करतात या नागरिकांच्या जीवाला देखील यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सध्या महापालिकेकडून मास्क न वापरणाऱ्यांना दंड केला जात आहे. मात्र तेच मास्क सार्वजनिक ठिकाणी फेकून देणाऱ्याकडून कोणताही दंड आकारला जात नसल्याने, नागरिक असे मास्क सार्वजनिक ठिकाणी फेकताना दिसत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या वतीने कारवाई करू
दरम्यान उघड्यावर वापरलेले मास्क टाकणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, मात्र नागरिकांनी देखील ती आपली जबाबदारी समजून मास्क किंवा अशा वस्तू सार्वजनिक रस्त्यावर टाकू नये, असे आवाहन घनकचरा व स्वच्छता विभागाचे अधिकारी निलेश जाधव यांनी केले आहे.