पालघर - मोदी सरकारला (२६ मे) रोजी ७ वर्षे पूर्ण होत आहेत. तर, दिल्लीतील शेतकरी आंदोलनालाही ६ महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्च्याच्या वतीने निषेध दिनाची देशव्यापी हाक देण्यात आली आहे. (२६ मे) हा 'निषेध दिवस' म्हणून पाळण्याच्या हाकेला डहाणूमध्ये माकपा आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी डहाणू रेल्वे स्थानकापर्यंत रॅली काढून काळे झेंडे घेत मोदी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. यामध्ये माकपाचे आमदार विनोद निकोले, माकपा जिल्हा कमिटी सदस्य चंद्रकांत गोरखना, धनेश अक्रे, राजेश दळवी, डॉ.आदित्य अहिरे, रेईस मिरजा, रूपाली राठोड, भरत कान्हात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
'शेतकरी आंदोलनाला पाठिंबा'
कोरोनामुळे हजारो लोक मरण पावले आहेत. काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सबंध देशातील ५०० पेक्षा अधिक किसान संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांनी 'संयुक्त किसान मोर्चा'द्वारे (२६ मे) हा 'निषेध दिवस' पाळण्याची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर डहाणू येथील रेल्वे स्थानकाजवळ काळे झेंडे दाखवत दिल्लीमध्ये आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना संयुक्त किसान मोर्चाने पाठिंबा दिला.