पालघर- खरंतर, रामदास आठवले म्हटलं की, सगळ्यांना त्यांच्या मजेशीर कविता आठवतात. आताही त्यांनी अशीच कविता करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. "नामांतर के पीछे मत पडो, शिवसेना काँग्रेसवालो आपस मे मत लडो" अशी कविता करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
तसेच आधी मी "गो कोरोना गो" हा नारा दिला होता. आता कोरोनावरील लस आल्यामुळे "नो कोरोना, कोरोना नो" असा नारा रामदास आठवले यांनी दिला आहे. अखिलेश यादव म्हणतात की, मी कोरोनाची लस टोचून घेणार नाही, "जे घेणार नाही त्यांना आम्ही देणार नाही". लस काही कोणाला बळजबरीने देण्यात येणार नाही, ही लस बीजेपीची तसेच समाजवादी पक्षाची देखील नाही, ही कोरोनावरील उपचारासाठी लस आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली. आज पालघर दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.