पालघर -शहरातील हुतात्मा चौकात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार होते. त्यामुळे मंगळवारी रात्री ८.३० वाजल्यापासून शेकडो शिवसैनिक ठाकरेंची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, वसई-विरार येथून ठाकरे पालघर येथे प्रचाराची वेळ संपल्यानंतर पोहोचले. त्यामुळे ठाकरेंची सभा न झाल्याने या ठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांचा हिरमोड झाला.
हुतात्मा चौकात उद्धव ठाकरेंची सभा न झाल्याने या ठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांचा हिरमोड झाला. निवडणूक आचारसंहितेनुसार रात्री १० वाजल्यानंतर प्रचार बंद करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकात कार्यकर्त्यांची भेट घेतली. निवडणूक आचारसंहितेमुळे एका कार्यकर्त्याने उद्धव ठाकरे नंतर पुन्हा पालघर येथे प्रचाराला येणार असून ते आपल्याशी संवाद साधतील, असे सांगितले.
पालघर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या पालघर दौऱ्यावर आले आहेत. त्याअनुषंगाने त्यांनी मंगळवारी वसई-विरार येथे भेट दिली. मात्र, पालघरच्या दिशेने येताना त्यांना दोन तासांहून अधिक वेळ उशीर झाला. त्यामुळे दहिसर, वरई, सफाळे, मकूणसार, माहीम आदी ठिकाणी दोन मिनिटे थांबून ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. तरीही उद्धव ठाकरे पालघर येथे प्रचाराची वेळ संपल्यानंतर पोहोचले.
प्रचाराची वेळ संपल्यानंतरही रात्री १० नंतर उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कार्यकर्त्याने निवेदन करणे, तसेच कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होणे. कितपत योग्य ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.