पालघर- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ मेंढवण खिंडीत टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. आज शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये टेम्पो चालक आणि क्लीनर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टेम्पो-ट्रकचा भीषण अपघात; चालक, क्लीनर जखमी - पालघर
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.
अपघातात टेम्पोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पोच्यामध्ये जखमी अवस्थेत अडकला होता. उपस्थित लोकांनी टेम्पो चालकाला कसेबसे गाडी बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी नागरिकांनी आयआरबीच्या रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, एक तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. त्यामुळे चालक आणि क्लीनर दोघेही जखमी अवस्थेत भर पावसात पडले होते. मात्र, चारोटी येथील रहिवासी हरिवंश सिंग हे याच रस्त्याने आपल्या घरी जात असताना त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या गाडीतून नेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.