पालघर -मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या २ आरोपींना नवघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अटक केली. या मांडूळ सापांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडीच कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वाजीद हुसेन मोहम्मद युसूफ कुरेशी (४७) आणि शंभू अच्छेलाल पासवान (३९) अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात वन्यजीव १९७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडुळाची तस्करी करणाऱ्या आरोपीसह पोलीस भाईंदर पूर्व साईबाबा फाटक येथे २ व्यक्ती मांडूळ साप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे नवघर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेऊन याठिकाणी सापळा रचला. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन आला. त्याच वेळी आणखी एक व्यक्ती तेथे आला. यावेळी सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये २ मांडूळ साप आढळून आले. या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडीच कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सापांचा वापर औषध तयार करण्यासाठी तसेच जादूटोणा करण्यासाठी केला जातो.
पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अप्पर अधीक्षक संजयकुमार पाटील आणि उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग, सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख आणि टिकाराम थाटकर सह उपनिरीक्षक विजय टक्के, संजय पाटील, प्रशांत वाघ, संदीप भालेराव, निलेश शिंदे, संदिप शिमदे, प्रदिप टक्के, महेश वेल्हे आणि महिला पोलीस सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.