पालघर: पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे व कर्मचारी रवींद्र गोरे, आर पवार,लहांगे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत होते. रेल्वे स्टेशन ते नवली फाटक परीसरात पेट्रोलींग करीत असतांना पहाटे ०३.१५ वाजताच्या सुमारास त्यांना नवली फाटका जवळील एस. बी. आय. बँकेच्या ए. टी. एम. च्या बाजुला असलेल्या मोकळया जागेत अंधाराच्या ठिकाणी काही जण दोन टेम्पोसह संशयीत हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले.
या संशयित तरुणांना पोलिसांनी जाब विचारताच त्यांनी अधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस व स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून टोळीतील १२ जणांना पकडले. त्यांची चौकशी केली असता ते मोठ्या दरोड्याच्या उद्देशाने आल्याची कबुली त्यांनी दिली.या टोळीतील काही दरोडेखोरांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
टोळी मधील तीन जण वसई येथील, तीन जण नालासोपारा येथील, दोन जण वडाळा येथील, एक जण शहापूर, तर एक जण उल्हासनगर येथील आहेत. दोन टेम्पो, लोखंडी कटर, लोखंडी धारदार कोयता, नॉयलॉन दोर, लोखंडी कटावणी, दोन हॅन्डलचे खिळे काढण्याचे लोखंडी कटर, वायर कापण्याचे लोखंडी कटर तसेच मिरची पुड असे साहीत्य या टोळीकडून हस्तगत करण्यात आले.